हैदराबाद - केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या समितीने अदानी आणि हिंदुस्थान शिपयार्डची संयुक्तपणे लावलेली बोली फेटाळली आहे. ही बोली सहा सुसज्ज अशा पाणबुड्यांच्या बांधणीसाठी लावण्यात आली होती. भारतीय नाविक दलाचा पी-७५आय हा पाणबुडी बांधणीचा ४५ हजार कोटींचा प्रकल्प आहे.
सूत्राच्या माहितीनुसार संरक्षण मंत्रालयाच्या सक्षमीकरण समितीने अदानी कंपनीची संयुक्त बोली फेटाळली आहे. मात्र, याबाबतचा निर्णय कधी घेतला आहे, हे सांगता येत नसल्याचे सूत्राने म्हटले आहे. जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा संरक्षण समितीच्या बैठकी बोलाविल्या जातात, असेही सूत्राने सांगितले.
संरक्षण अधिग्रहण परिषद (डीएसी) ही संरक्षण मंत्रालयाची उच्चस्तरीय खरेदी समिती आहे. या समितीची मंगळवारी पहिली बैठक झाली. यामध्ये इंडियन स्ट्रॅटजिक पार्टनर्स (एसपी) आणि पोटेन्शियल ओरिजनल एक्विपमेंट मॅन्युफॅक्चुअर्स (ओईएमएस) या कंपन्यांची यादीत निवड (शॉर्टलिस्ट) करण्यात आली आहे.
हेही वाचा-मंदावलेल्या अर्थव्यवस्थेच्या संकटात पडली भर; 'हे' आहे कारण
काँग्रेसने अदानी डिफेन्सवरून सरकारवर केली होती टीका
काँग्रेसने १५ जानेवारीला पत्रकार परिषद घेत अदानी डिफेन्सचा निवड यादीत समावेश करण्यात येणार असल्याचा दावा केला होता. यापूर्वीच नाविक दलाच्या सक्षमीकरण समितीने अदानी डिफेन्सची संयुक्त बोली फेटाळली होती, याकडे काँग्रेसने पत्रकार परिषदेत लक्ष वेधले होते. जहाजबांधणी अथवा पाणबुडी बांधणीचा अदानी डिफेन्सला शून्य अनुभव असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी केली होती. पाणबुडी बांधणीचा की उर्जा प्रकल्प बांधणीचा अनुभव लक्षात घेतला जाणार आहे, अशी काँग्रेसने बोचरी टीका केली होती. सध्या, देशात केवळ माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. (एमडीएसएल) या कंपनीला पाणबुडी आणि जहाजबांधणीचा अनुभव आहे.