इस्लामाबाद – कोरोनाच्या संकटाने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. तरीही चीनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सीपीईसी हा प्रकल्प कोणत्याही किमतीत पूर्ण करू, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जाहीर केले आहे.
चीन -पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीपीईसी) हा प्रकल्प पाकिस्तान आणि चीनच्या मैत्रीचे प्रतिक आहे. पाकिस्तान सरकार हे कोणत्याही किमतीत हा प्रकल्प पूर्ण करणार आहे. त्याचा लाभ प्रत्येक पाकिस्तानीला देणार असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटल्याचे पाक माध्यमांनी म्हटले आहे. इम्रान खान हे सीपीईसीच्या कामाच्या आढावा बैठकीनंतर बोलत होते.
सीपीईसी हा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामधून आशिया, आफ्रिका आणि युरोप हा महामार्गांच्या जाळ्यांमधून जोडण्याची चीनची आहे. यामध्ये सागरी मार्गांसह रेल्वे मार्गांचाही समावेश आहे.
अब्जावधी डॉलर खर्चून तयार करण्यात आलेल्या कॉरिडॉरमध्ये चीनची कशागर आणि पाकिस्तानचे अरबी समुद्रातील ग्वादार येथील बंदर जोडण्यात येणार आहे. सीपीईसीमधून पाकिस्तानच्या पायाभूत सुविधा आणि अर्थव्यवस्थेला बळकट करण्याचा उद्देश असल्याचे पाकिस्तानच्या माध्यमाने म्हटले आहे. प्रकल्पामध्ये चीनमध्ये आधुनिक वाहतुकीचे जाळे, विविध उर्जा प्रकल्प आणि विशेष आर्थिक क्षेत्रांची सुरुवात आदींचा समावेश आहे.
चीन -पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हा पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून जातो. त्यामुळे भारत हा चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमध्ये सहभागी झाला नाही.