नवी दिल्ली - बिगर बँकिंग क्षेत्रातील कंपनी (एनबीएफसी) असलेल्या आयएल अँड एफ एसने ९० हजार कोटींहून अधिक कर्ज थकविले आहे. त्यानंतर अन्य काही मोठ्या एनबीएफसी कंपन्यांनीही कर्ज फेडण्यात असमर्थता दाखविली आहे. या प्रकारामुळे एनबीएफसी मोठ्या संकटांना सामोरे जात असल्याचे मत कॉर्पोरेट व्यवहाराचे सचिव इंजेती श्रीनिवास यांनी व्यक्त केले.
कॉर्पोरेट व्यवहाराचे सचिव इंजेती श्रीनिवास म्हणाले, बिगर बँकिंग वित्तीय क्षेत्र हे थकलेले कर्ज आणि काही कंपन्यांच्या चुकांचा परिणाम भोगत आहे. या क्षेत्रापुढे मोठे संकट आहे. कर्ज उपलब्ध नसल्याने कर्ज देणारे व घेणारे यामधील अंतर वाढले आहे. या स्थितीबाबत कंपनी व्यवहार मंत्रालय अभ्यास करत आहे. यातून मार्ग निघत असल्याचा त्यांनी दावा केला. मात्र अल्पकाळासाठी काही समस्या असू शकतात, असेही श्रीनिवास म्हणाले.
कंपन्यांचे व्यवस्थित नियमन आवश्यक-
देशामध्ये अनेक कंपन्यांची स्थिती भक्कम असून त्या आर्थिक जोखीम घेतात. त्यासाठी कंपनीचे व्यवस्थित नियमन केले जाते. त्यामुळे त्यांना आर्थिक धोकादायक स्थितीचा सामना करावा लागत नसल्याचेही श्रीनिवास म्हणाले. आयएल अँड एफ एसने कर्ज थकविल्यानंतर एनबीएफसी क्षेत्रात अल्प कर्जपुरवठा होत आहे. त्यामुळे गतवर्षी पायाभूत विकासात अनेक अडथळे आले आहेत.