नवी दिल्ली - चालू वर्षात २० हजार कोटी रुपयांचे जीएसटी मोबदला उपकराचे संकलन झाले आहे. हा उपकराचा निधी राज्यांना आज रात्री देण्यात येणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितले. त्या ४२ व्या जीएसटी बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होत्या.
राज्यांना २४ हजार कोटींच्या आयजीएसटी देण्यात येणार आहे. ज्या राज्यांना आयजीएसटीचा निधी कमी मिळाला आहे, अशा राज्यांना हा निधी पुढील आठवड्यात देण्यात येणार असल्याचेही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितले.
ज्या प्राप्तिकरदात्यांची उलाढाल वार्षिक 5 कोटी रुपयांहून कमी आहे, त्यांच्यासाठी दिलासादायक निर्णय जीएसटी परिषदेत घेण्यात आला आहे. अशा प्राप्तिकरदात्यांना दर महिन्याला जीएसटीआर ३बी आणि जीएसटीआर१ चे विवरणपत्र भरावे लागणार नाही. त्यांना तीन महिन्याला विवरणपत्र भरावे लागणार असल्याचे केंद्रीय अर्थसचिव अजय भूषण पांडे यांनी यावेळी सांगितले.