नवी दिल्ली – कोचिन शिपयार्ड लि. (सीएलएल) कंपनीला दोन स्वयंचलित इलेक्ट्रिक जहाजाची बांधणी आणि पुरवठ्याचे कंत्राट मिळाले आहे. ही माहिती केंद्रीय जहाजबांधणी मंत्रालयाने दिली आहे.
इलेक्ट्रिक बोटीच्या (जहाज) कामासाठी सीएलएल कंपनीने नॉर्वेच्या अॅस्को मॅरिटाईम एस कंपनीबरोबर करार केला आहे. सीएसएल ही व्यापारी कामासाठी जहाजबांधणी करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनीला अॅस्को मॅरिटाईम एस कंपनीकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे. ही कंपनी नॉर्वेमधील रिटेल क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. स्वयंचलित इलेक्ट्रिक जहाज तयार करण्याचा नॉर्वेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यासाठी नॉर्वे सरकारने अंशत: आर्थिक मदत केली आहे. या प्रकल्पामधून कार्बनचे उत्सर्जन न होता पर्यावरणस्नेही वाहतूक व्हावी, असा नॉर्वे सरकारचा हेतू आहे.
या इलेक्ट्रिक जहाजाचे काम पूर्ण झाल्यानंतर जगात नवा मापदंड ठरणार असल्याचे जहाजबांधणी मंत्रालयाने म्हटले आहे. हे जगातील पहिले स्वयंचलित चालणारे इलेक्ट्रिक व कार्बनमुक्त उत्सर्जन असलेले जहाज ठरणार आहे. हे जहाज 67 मीटर लांब असणार आहे. त्यामध्ये 1 हजार 846 किलोवॅट हॉर्सपॉवर क्षमतेची बॅटरी असणार आहे.