देहराडून – उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांना राज्यात गुंतवणूक करण्यासाठी निमंत्रित केले आहे. उत्तराखंड सरकारकडून पूर्ण मदत करण्यात येईल, असे रावत यांनी पिचाई यांना आश्वासन दिले आहे.
नुकतेच गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी गुगल इंडियामधून भारतात येत्या पाच वर्षांत 75 हजार कोटींची गुंतवणूक करण्याचे जाहीर केले आहे. या गुंतवणुकीत उत्तराखंडचाही समावेश करावा, अशी विनंती मुख्यमंत्री रावत यांनी पिचाई यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.
पत्रात म्हटले, की कोरोना महामारीच्या संकटात पर्यायी विकास प्रारुपावर विचार करण्याची गरज असल्याचे वाटत आहे. छोट्या शहरांमधील आयटी क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या संधी आहेत. त्यासाठी कंपनीला उत्तराखंड सरकारकडून सहकार्य करण्यात येईल, असे रावत यांनी आश्वासन दिले आहे. या विषयाबाबत राज्याचे मुख्य सचिव उत्पल कुमार सिंह आणि अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा पानवार यांनी गुगलच्या व्यवस्थापनाशी समनव्य साधावा, अशा सूचना रावत यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, कोरोना महामारीत अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या गुंतवणुकीसाठी नवीन ठिकाणांचा शोध घेत आहेत. त्यादृष्टीने गुगलची भारतामधील गुंतवणूक ही विशेष महत्त्वाची मानली जाते.