मुंबई - पुरामध्ये कोल्हापूर आणि सांगलीमधील व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशा व्यापाऱ्यांना प्राप्तिकर व जीएसटी भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी, यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विनंती करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुरग्रस्त व्यापाऱ्यांचे कर्ज पुनर्गठन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, व्यापाऱ्यांना प्राप्तिकर भरण्यासाठी मुदत वाढ मिळण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विनंती करण्यात येणार आहे. तसेच जीएसटी भरण्यासाठी व्यापाऱ्यांना मुदतवाढ मिळावी, यासाठी जीएसटी परिषदेला विनंती करण्यात येणार आहे.
जम्मू काश्मीरला राज्यात गुंतवणूक परिषद आयोजन करण्यासाठी पूर्ण सहकार्य करू, असेही त्यांनी सांगितले. वाहन उद्योगामधील मंदीबाबत विचारले असताना त्यांनी काही क्षेत्रामधील मंदी तात्पुरती असल्याचे सांगितले. त्यावर केंद्र सरकार लक्ष ठेवून आहे. आरबीआयनेही काही उपाय केल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, प्राप्तिकरासाठीचे विवरण पत्र भरण्याची ३१ ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. पुरामुळे अनेक गोदामे व दुकानातील मालाचे नुकसान झाले आहे. तसेच कागदपत्रेही पाण्यात खराब झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना अडचणी येत आहेत.