नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी आर्थिक पॅकेज आज जाहीर केले. यामध्ये पशुसंवर्धनाच्या पायाभूत विकासासाठी १५ हजार कोटींचा निधी देण्याची घोषणा सीतारामन यांनी केली.
निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की देशातील अनेक भागात दुधाचे चांगले उत्पादन घेण्याची क्षमता आहे. दुग्धोत्पादन क्षेत्रातील खासगी गुंतवणुकीला सरकार मदत करणार आहे. दुग्धप्रक्रिया, मूल्यवर्धन आणि पशुखाद्याच्या पायाभूत सुविधेत खासगी गुंतवणूक वाढावी, अशी केंद्र सरकारला अपेक्षा आहे.
हेही वाचा-टाळेबंदीने बेरोजगारीत वाढ; जाणून घ्या, विविध क्षेत्रांवर झालेला परिणाम
निर्यातक्षम उत्पादन प्रकल्प सुरू करण्यासाठी केंद्र सरकार उद्योगांना सवलती देणार आहे. हे पॅकेज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा भाग आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय पशू रोग नियंत्रण कार्यक्रमाची घोषणा केली. यामधून पशुंच्या तोंडाचे आणि पायांचे रोग तसेच ब्रुसेलोसिस हा रोग नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी १३ हजार ३४३ कोटी रुपयांचा खर्च केंद्र सरकार करणार आहे. या लसीकरण योजनेतून म्हशी, गायी, मेंढ्या, शेळ्या आणि डुक्कर अशा सर्व प्राण्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. देशातील एकूण ५३ कोटी पशूसंपत्तीचे लसीकरण करण्याचे केंद्र सरकारने उद्दिष्ट निश्चित केले आहे. सध्या, १.५ कोटी गायी आणि म्हशींचे लसीकरण करण्यात आलेले आहे.
हेही वाचा-कोरोनाचा फटका; एप्रिलमध्ये निर्यातीत ६०.२८ टक्क्यांची घसरण