नवी दिल्ली – देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच केंद्र सरकारने व्हेंटिलेटरच्या निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड -19 वर स्थापन कण्यात आलेल्या केंद्रीय मंत्र्यांच्या उच्चस्तरीय गटाने स्वदेशी व्हेटिंलेटरच्या निर्यातीला परवानगी दिली आहे. याविषयीचा प्रस्ताव आरोग्य मंत्रालयाने केंद्रीय मंत्र्यांच्या गटाकडे सादर केला होता.
देशातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूदराचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. सध्या कोरोनाबाधितांचा मृत्यूदर हा 2.15 टक्के आहे. त्यामुळे देशात कमी कोरोनाबाधित रुग्ण हे व्हेंटिलेटरवर असल्याचे सूचित होत असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. देशात 31 जुलैअखेर व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचे प्रमाण हे 0.22 टक्के राहिले आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गटाने विदेश व्यापार महासंचालनायाबरोबर संवाद साधून स्वदेशी व्हेंटिलेटरच्या निर्यातीला परवानगी दिल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. पुढील कार्यवाहीसाठी स्वदेशी व्हेटिंलेटरच्या उत्पादकांना निर्यातीच्या सुविधा देण्याची गरज आहे. निर्यातीला परवानगी दिल्याने देशातील व्हेटिंलेटर उत्पादकांना विदेशातील बाजारपेठेत स्थान मिळविणे शक्य असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
मार्चपासून व्हेंटिलेटरच्या निर्यातीवर निर्बंध-
देशामध्ये व्हेंटिलेटरचे उत्पादन करण्याचे प्रमाण वाढले आहे. देशात व्हेंटिलेटरचे उत्पादन घेणाऱ्यांची संख्या जानेवारीहून 20 ने वाढली आहे. केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चमध्ये व्हेंटिलेटरच्या निर्यातीवर निर्बंध लागू केले होते. देशात कोरोनाच्या लढ्यात आरोग्य साधनांची कमतरता भासू नये, याकरता व्हेंटिलेटरच्या निर्यातीवर निर्बंध लागू केले होते. सर्व प्रकारच्या व्हेंटिलेटरच्या निर्यातीवर निर्बंध लागू करण्याचे विदेश व्यापार महासंचालनायाने 24 मार्चला अधिसूचना काढली होती.