मुंबई - येस बँकेसह पीएनबीची फसवणूक करणाऱ्या डीएचएफएलच्या प्रवतर्कांचा आणखी नवीन कारनामा सुरू आला आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने डीएचएफएल आणि कपिल-धीरज वाधवान या पिता-पुत्रांवर पीएम ग्रामीण आवास योजनेत बनावट गृहकर्ज प्रकरणे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
डीएचएफएल कंपनीने वांद्र्यामध्ये कागदोपत्री शाखा उघडली होती. ज्यांनी गृहकर्ज फेडले आहे, त्या कर्जदाराच्या नावाने बनावट गृहकर्जाची प्रकरणे तयार करण्यात येत होती, असा सीबीआयला संशय आहे.
हेही वाचा-एका बिटकॉईनवर खरेदी करता येणार टेस्ला; एलॉन मस्क यांची घोषणा
डीएचएफएलवर येस बँकेसह पीएनबीची फसवणूक केल्याचा आरोप
डीएचएफएलच्या बुडित कर्ज खात्यामधून बँकेची 3 हजार 688.58 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती पीएनबीने गतवर्षी शेअर बाजाराला दिली होती. कंपनीने काही बनावट कंपन्यांमधून बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. कंपनीने अनेक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर ईडी, एसएफआयओ या संस्थांच्या नजरेत डीएचएफएल आली आहे. या कंपनीवर येस बँकेत घोटाळा केल्याचाही आरोप आहे.
हेही वाचा-इंडिगोकडून टाळेबंदीत उड्डाणे रद्द झाल्यानंतर १,०३० कोटी रुपये प्रवाशांना परत
टाळेबंदीत नियमांचे उल्लंघन केल्याने वाधवान आले होते चर्चेत-
डीएचएफएलसह अन्य घोटाळ्यांमुळे चर्चेचा विषय ठरलेल्या कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांच्यासह २३ जण सुटी घालवण्यासाठी महाबळेश्वरला गेल्याचे प्रकरण एप्रिल २०२० मध्ये समोर आल्याने खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगी दिल्याचे उघड झाले होते. विशेष म्हणजे या काळात संपूर्ण देशात टाळेबंदीचे कठोर नियम लागू करण्यात आले होते.