नवी दिल्ली - जागतिक आरोग्य संघटना या महत्त्वाच्या संस्थेवर भारतीय अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्याने देशाच्या सन्मानात भर पडली आहे. भारतीय महालेखापरीक्षक राजीव महर्षी यांची जागतिक आरोग्य संघटनेच्या बहिस्थ लेखापरीक्षकपदी निवड झाली आहे. ही निवड २०२० ते २०२३ या चार वर्षांसाठी असणार आहे.
महर्षी यांची जीनीव्हामधील ७२ व्या जागतिक आरोग्य अधिवेशनात बहुमताने बहिस्थ लेखापरीक्षक म्हणून निवड झाली. यावेळी त्यांनी काँगो, फ्रान्स,घाना, ट्युनिशिया आणि इंग्लंड आणि उत्तर आयर्लंड हे प्रमुख देशांच्या उमेदवारांना निवडणुकीत पराभूत केले.
राजीव हे जागतिक आरोग्य संघटनेचे बहिस्थ लेखापरीक्षक म्हणून जबाबदारी स्विकारणार आहेत. या वर्षात त्यांना दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय लेखापरीक्षणाची जबाबदारी मिळाली आहे. यापूर्वी रोममधील अन्न आणि शेती संस्थेसाठी बहिस्थ लेखापरीक्षक म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. ही निवड मार्च २०१९ मध्ये करण्यात आली होती. महर्षी हे सध्या संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या लेखापरीक्षकांच्या संचालक मंडळाचे सदस्य आहेत. तसेच संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या बहिस्थ लेखापरीक्षकांच्या पॅनेलचे उपाध्यक्ष आहेत.