हैदराबाद- कर्जबुडव्या विजय मल्ल्याचे भारताला होणारे प्रत्यार्पण पुन्हा रखडणार आहे. कायदेशीर वाद सुटले नसल्याचे सांगत प्रत्यार्पण शक्य नसल्याचे ब्रिटिश उच्चायुक्त कार्यालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
देशामधील ब्रिटिश उच्चायुक्त कार्यालयाचे प्रवक्ते म्हणाले, की कायदेशीर वाद सुटत नाहीत, तोपर्यंत प्रत्यार्पण शक्य नाही. असा ब्रिटनचा कायदा आहे. हा वाद गोपनीय आहे. आम्ही त्याबाबत खोलात जाणार नाही. हा वाद सोडविण्यासाठी किती वेळ लागेल, याचा आम्ही अंदाज बांधू शकत नाही. हा वाद शक्य तितक्या लवकर सोडविण्याचा प्रयत्न करत आहोत.
विजय मल्ल्या हा गेल्या महिन्यात इंग्लंडच्या सर्वोच्च न्यायालयात प्रत्यार्पणाचा खटला हरला आहे. मात्र त्यानंतरही कायदेशीर वाद असल्याचे ब्रिटिश उच्चायुक्त कार्यालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
दरम्यान, मल्ल्याने देशातील सरकारी बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडविले आहे. इंग्लंडमधील न्यायालयांनी मल्ल्याचे प्रत्यार्पण विरोधातील दावे यापूर्वीच फेटाळले आहेत.