नवी दिल्ली - जगभरातील अर्थव्यवस्था खुल्या होत आहेत. तर याचवेळी जागतिक बाजारपेठेत खनिज तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. तेल उत्पादक संघटना ओपेक आणि रशियाची येत्या काही दिवसात बैठक होणार आहे. या बैठकीत खनिज तेलाच्या उत्पादनात कपात करण्याविषयी चर्चा करण्यात येणार आहे.
खनिज तेलाच्या उत्पादनात आघाडीवर असलेल्या सौदी अरेबियाने वर्षअखेरपर्यंत खनिज तेलाचे उत्पादन कमी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. आंतरखंडीय शेअरबाजारात ऑगस्टच्या सौद्यांकरता खनिज तेलाची किंमत प्रति बॅरल 1.42 टक्क्यांनी वधारून 40.13 डॉलर झाली आहे. अमेरिकेच्या खनिज तेल निर्देशांकातही (WTI crude) खनिज तेलाच्या किमती वधारल्या आहेत.
जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किमती काही महिने घसरल्यानंतर पुन्हा वधारत आहेत. हा परिणाम एक मे रोजीपासून खनिज तेलाचे उत्पादन कमी केल्यानंतर दिसून येत आहे. ओपेक आणि रशियाने खनिज तेलाचे उत्पादन कमी करण्याचा करार एप्रिलमध्ये केला होता. यानुसार मे आणि जूनमध्ये रोज 9.7 दशलक्ष बॅरेलचे उत्पादन कमी करण्यात येत आहे.
खनिज तेलाच्या साठवणुकीचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांच्या किमती एप्रिलमध्ये शून्यापेक्षाही कमी झाल्या होत्या. दरम्यान कोरोनाच्या संकटामुळे जगभरातील अर्थव्यवस्थांना फटका बसला आहे. अशात खनिज तेलाच्या किमती वाढल्याने अनेक देशांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.