नवी दिल्ली - भारत पेट्रोलियम कंपनीच्या खासगीकरणाची प्रक्रिया या आठवड्यात सुरू होणार आहे. त्यासाठी बीपीसीएलमधील हिस्सा विकण्यासाठी लंडन, दुबई आणि अमेरिकेमध्ये केंद्र सरकार रोड शो करणार आहे. ही माहिती डीआयपीएएम आणि तेल उद्योग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे (डीआयपीएएम) अधिकारी हे इच्छुक असलेल्या गुंतवणूकदारांना भेटून बीपीसीएलमधील हिस्सा विकण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे देशातील तेलाच्या बाजारपेठेत संबंधित गुंतवणूकदारांना प्रवेश करता येणार आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद आणि चिंता लक्षात घेऊन बीपीसीएलचा एक्सप्रेसेशन ऑफ इंटरेस्ट तयार करण्यात येणार आहे.
भारत सरकारने बीपीसीएलमधील ५३.२९ टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. हा हिस्सा विकत घेण्याबाबत अॅरेम्को कंपनीने अद्याप भूमिका जाहीर केली नाही. सौदी अरेबियाची अॅरेम्को ही भांडवली मूल्य २ लाख कोटी डॉलर असलेली जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. चालू आर्थिक वर्षात बीपीसीएलमध्ये निर्गुंतवणूक करणे गुंतागुंतीचे ठरू शकेल, असे निर्मला सीतारामन यांनी संकेत दिले होते.
हेही वाचा - शेअर बाजार ४२८ अंशाने वधारून बंद; जागतिक मंचावरील सकारात्मक बदलाचा परिणाम
गुंतवणूकदाराला करावी लागणार १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक -
बीपीसीएलमध्ये कंपनीला किमान १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागणार असल्याचे बाजारातील सूत्राने सांगितले. सरकारचा कंपनीमध्ये सुमारे ६० हजार कोटी रुपयांहून अधिक हिस्सा आहे. जर एखाद्या गुंतवणूकदार कंपनीने २५ टक्के हिस्सा घेतला तर त्या कंपनीला १ लाख कोटी रुपये सरकारला द्यावे लागणार आहेत. कंपनीमध्ये सौदी अॅरेम्को, टोटल, एक्ससोनमोबील अथवा शेल कंपनीला बीपीसीएलचा पूर्ण हिस्सा विकण्यासाठी सरकार नियोजन करत आहे.
संबंधित बातमी वाचा - देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या पेट्रोलियम कंपनीचे होणार खासगीकरण; सरकारकडून तयारी सुरू
अशी आहे भारत पेट्रोलियम कंपनी-
भारत पेट्रोलियम कंपनीचे मुंबई, कोची, बिना आणि नुमालीगढ असे चार ठिकाणी तेल शुद्धीकरण प्रकल्प आहेत. यामधून एकूण ३८.३ दशलक्ष टन इंधन कच्च्या तेलापासून तयार करण्याची क्षमता आहे. भारत पेट्रोलियम कंपनीचे देशात १५ हजार ७८ पेट्रोल पंप आहेत. तर ६ हजार ४ एलपीजी वितरक आहेत. या कंपनीच्या निर्गुंतवणुकीमधून १.०५ लाख कोटी रुपये जमविण्याचे केंद्र सरकारने उद्दिष्ट निश्चित केले आहे.