नवी दिल्ली – भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन कंपनीच्या (बीपीसीएल) बोली प्रक्रिया संपण्याकरता आठवडाभराचा अवधी आहे. अशातच कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छा निवृत्ती योजना जाहीर केली आहे.
बीपीसीएलने कंपनीचा 52.98 टक्के हिस्सा विक्रीला काढला आहे. त्यासाठी इच्छुक बोली दाखल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे. यापूर्वी कंपनीने दोनदा बोली मागविण्याकरता मुदतवाढ दिली आहे.
भारत पेट्रोलियमची ‘स्वेच्छा निवृत्ती योजना 2020’ (व्हीआरएस) 23 जुलैला सुरुवात होवून 13 ऑगस्टला संपणार आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना पत्र पाठवून स्वेच्छा निवृत्ती योजनेची माहिती दिली आहे. कंपनीने पत्रात म्हटले, की जे कर्मचारी काम करण्याच्या स्थितीत नाहीत, त्यांच्यासाठी व्हीआरएस योजना सुरू केली आहे.
अशी आहे स्वेच्छा निवृत्ती योजना
जेवढी वर्ष काम केली आहे, त्या प्रत्येक वर्षाहून दुप्पट महिन्यांचे वेतन कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे वय 45 वर्षांहून अधिक आहे, असेच कर्मचारी व्हीआरएस योजनेसाठी पात्र असणार आहेत. कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंरच्या वैद्यकीय सुविधांचा लाभही मिळणार आहे. शिल्लक असलेल्या सुट्ट्यांसाठी कर्मचाऱ्यांना पैसेही मिळणार आहेत.
बीपीसीएलचे देशात १५ हजार ७८ पेट्रोल पंप
दरम्यान, बीपीसीएलच्या हिस्सा खरेदी करण्यासाठी जगातील मोठ्या तेल आणि वायू कंपन्यांनी रस दाखविला आहे. बीपीसीएलचे भांडवली मूल्य हे 97 हजार 247 कोटी रुपये आहे. तर सरकारची कंपनीमध्ये असलेल्या हिश्श्याची किंमत 51 हजार 500 कोटी रुपये आहे. बीपीसीएलचे मुंबई, कोची (केरळ), बिना (मध्यप्रदेश), नुमालीगढ(आसाम) येथे तेलशुद्धीकरण केंद्र आहेत. तर बीपीसीएलचे देशात १५ हजार ७८ पेट्रोल पंप आहेत. तर ६ हजार ४ एलपीजी वितरक आहेत.