नवी दिल्ली - महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने बोलेरो पिक-अपच्या उत्पादनात आज मैलाचा दगड गाठला आहे. बोलेरो पिक-अपचे पंधरा लाखावे उत्पादन हे मुंबईच्या कांदिवली उत्पादन प्रकल्पामधून घेण्यात आले.
एम अँड एमचे अध्यक्ष राजन वढेरा (ऑटोमिटिव्ह क्षेत्र) म्हणाले, हे यश म्हणजे आमच्या ब्रँडवर ग्राहकांनी दाखविलेला विश्वास आहे. एम अँड एमचे बोलेरो पिक अप, बोलेरो मॅक्सी ट्रक, बोलेरो कॅम्पर आणि इम्पेरिओ ही चार पिक अपची मॉडेल आहेत. गेली २० वर्षे पिक अप वाहनाच्या प्रकारामध्ये आघाडीवर आहोत. ग्राहकांची गरज ओळखणारी यंत्रणा आणि प्रक्रिया तयार केल्याचे त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे वाहन उद्योग सध्या मंदीतून जात असताना महिंद्रा आणि महिंद्राने हे यश मिळविले आहे.
जुलैमध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत ११ टक्क्यांची घट-
वाहन वितरकांची संघटना असलेल्या एफएडीएने प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट झाल्याचे म्हटले आहे. गतवर्षीच्या तुलनेत जुलैमध्ये प्रवास वाहनांच्या विक्रीत ११ टक्क्यांनी घट झाल्याचे एफएडीएने म्हटले आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन्सच्या (एफएडीए) आकडेवारीनुसार जुलै २०१८ मध्ये २ लाख ७४ हजार ७७२ प्रवासी वाहनांची विक्री झाली.