नवी दिल्ली - कर्जबुडव्या विजय मल्ल्याने इंग्लंडच्या सर्वोच्च न्यायालयात प्रत्यार्पणाविरोधात दाखल केलेले अपील न्यायालयाने फेटाळून लावले आहे. हा मोठा विजय असल्याचे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने म्हटले आहे. या निकालाने मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
लंडनमधील उच्च न्यायालयाने (वेस्टमिनिस्ट मॅजिस्ट्रेट न्यायालय) विजय मल्ल्याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास मान्यता देणारा निकाल २० एप्रिलला दिला होता. या दिवसापासून १४ दिवसात मल्ल्याला सर्वोच्च न्यायलयात अपील करणे बंधनकारक होते. त्यामुळे इंग्लंडच्या सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळण्यासाठी मल्ल्याने अपील केले. मात्र, हे अपील फेटाळून लावण्यात आले. भारत सरकारने गेल्या आठवड्यात आपली बाजू मांडणारे कागदपत्रे सर्वोच्च न्यायालयात दाखल केले होते.
हेही वाचा-कोणत्याही अटी न घालता पैसे घ्या आणि माझ्याविरोधातील खटला बंद करा - विजय मल्ल्या
काय आहे प्रकरण-
विजय मल्ल्याने किंगफिशर आणि इतर कंपन्यांची चुकीची माहिती दिल्याचा भारताने आरोप केला होता. भारताने प्रत्यार्पणाच्या केलेल्या मागणीविरोधात मल्ल्याने लंडनमधील उच्च न्यायालयात यापूर्वी आव्हान दिले होते. रॉयल कोर्ट ऑफ जस्टीसच्या न्यायमूर्ती स्टीफन आयर्विन आणि न्यायाधीश एलिझाबेथ लैंग यांनी मल्ल्याचे अपील फेटाळून लावले. मल्ल्यावर ९ हजार कोटी रुपयांची बँकांची फसवणूक आणि मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप आहे.
हेही वाचा-'चोक्सी, मल्ल्या यांना कर्ज कोणी दिले, हा प्रश्न राहुल यांनी राजन यांना विचारावा'
'सरकारी बँका पाहिजे तेवढे पैसे छापू शकतात. मात्र, मी १०० टक्के पैसे सरकारी बँकेला देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, माझ्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. कोणत्याही अटीविना माझे पैसे परत घ्या आणि खटला बंद करा,' असे विजय मल्ल्या याने नुकतेच ट्विटमध्ये म्हटले आहे.