नवी दिल्ली – कोरोनाच्या संकटात रोजंदारीने काम करणाऱ्या मजुरांना मनरेगातून मोठा आधार मिळाला आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार जुलैमध्ये मनरेगामधील मजुरांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत 114 टक्क्यांनी वाढली आहे. तर मे महिन्यापासून मनरेगामधील मजुरांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे.
गतवर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत यंदा मे महिन्यात मनरेगा योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 73 टक्क्यांनी वाढली आहे. तर हेच प्रमाण जुनमध्ये 92 टक्के तर जुलैमध्ये 114 टक्क्यांनी वाढले आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढत असताना महानगरांसह शहरामधून मोठ्या प्रमाणात मजूर गावांकडे स्थलांतरित झाले आहेत. अशा मजुरांना मनरेगामधून उदरनिर्वाहाचे साधन त्यांच्याच गावात मिळू शकले आहे. कोरोनाच्या संकटकाळात मजुरांना दिलासा देण्यासाठी आर्थिक पॅकेजमध्ये केंद्र सरकारने अतिरिक्त 40 हजार कोटींची तरतूद केली आहे. या निधीचा उपयोग मनरेगा योजनेसाठी करण्यात येणार आहे.
- देशात मनरेगा योजनेतून जुलै 2020 मध्ये 2.26 कोटी लोकांना रोजगार मिळाला आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात 1.05 टक्के लोकांना मनरेगामधून रोजगार मिळाला होता.
- जुनमध्ये 3.35 कोटी लोकांना तर मे महिन्यात 2.51 कोटी लोकांना रोजगार मिळाला आहे. तर गतवर्षी जुनमध्ये 1.74 कोटी लोकांना तर मे महिन्यात 1.45 कोटी लोकांना रोजगार मिळाला होता.
काय आहे मनरेगा योजना?
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) ग्रामीण भागतील लोकांना रोजगार देण्यात येतो. ही योजना केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाकडून राबविण्यात येते. मनरेगामधून लोकांना वर्षभरात 100 दिवसांचा रोजगार देण्याची हमी दिली जाते.