मुंबई - बँक अधिकारी संघटनेने २६ व २७ सप्टेंबरला संप पुकारला आहे. २८ सप्टेंबरला चौथा शनिवार व २९ सप्टेंबरला रविवार असल्याने चार दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना बँकिंग सेवेचा लाभ घेताना त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने १० बँकांचे ४ बँकांत विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला विरोध करत बँक कर्मचारी संघटनेने संप पुकारला आहे.
सरकारी बँकांचा संप २५ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून सप्टेंबर २७ पर्यंत सुरू राहणार असल्याचे एआयबीओसीचे महासचिव दीपक कुमार शर्मा यांनी चंदीगडमध्ये सांगितले.
संपात सुमारे ४ लाख कर्मचारी-अधिकारी सहभागी होतील, असा संघटनेने दावा केला आहे. हा संप यशस्वी झाला, तर देशातील बहुतांश बँकांच्या शाखा बंद राहणार आहेत.
हेही वाचा-विलिनीकरणाला विरोध; सरकारी बँकांचे अधिकारी २६ सप्टेंबरपासून २ दिवसांच्या संपावर
धनादेश वटविणे (चेक क्लिअरन्स) यांच्याबरोबरच एटीएमच्या सेवेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या ,एनईएफटी आणि आरटीजीएसची सेवा सकाळी ८ ते रात्री ७ पर्यंत देण्यात येते. त्यामुळे बँक ग्राहकांना संप आणि सलग सुट्ट्यांचा त्रास सहन करावा लागणार आहे.
हेही वाचा-सरकारी बँकांचे विलिनीकरण म्हणजे 'टू बिग टू फेल' या चुकीच्या युक्तीवादातून शिकण्याचा धडा
संपात या संघटना सहभागी होणार-
ऑल इंडिया बँक ऑफिर्स कॉन्फेडरेशन (एआयबीओसी), ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन (एआयबीओए), इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस (आयएनबीओसी), नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स (एनओबीओ)
हेही वाचा-आरबीआयकडून ४ ऑक्टोबरच्या पतधोरण निर्णयात पुन्हा व्याजदर कपात होणार : तज्ज्ञांचा अंदाज
या आहेत बँक कर्मचारी संघटनेच्या मागण्या
- कामाचा आठवडा पाच दिवसांचा असावा
- आर्थिक व्यवहार करण्याचे तास कमी करावेत.
- कामाच्या वेळेचे नियमन करावे.
- निवृत्तां दावे निकालात काढणे
- पुरेशी नोकरभरती करणे, एनपीएस काढून टाकणे
- ग्राहकांसाठीचा सेवाकर कमी करणे