मुंबई - बजाज फायनान्सकडून ऑटोसाठी कर्ज घेणाऱ्यांना दिलासादायक बातमी आहे. बजाज फायनान्स ऑटो कर्जाच्या ईएमआयला उशीर झाला तरी दंड आकारणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रात ऑटोसाठी कर्ज घेणाऱ्यांना बजाज फायनान्सकडून मार्च ते सप्टेंबरपर्यंत ईएमआयवर अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ऑटो संघटनेने ईएआयएमवरील दंड माफ करण्याची बजाज फायनान्स कंपनीकडे मागणी केली होती. त्यावर बजाज फायनान्सने ईएमआयचे धनादेश वटले नाही तर ५० टक्के शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मार्च ते ऑगस्टमधील थकित कर्जावरील अतिरिक्त शुल्क ५० टक्के माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील १.१९ लाख ग्राहकांना फायदा होणार आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने मार्च ते ऑगस्टमध्ये कर्जफेडीसाठी मुदतवाढ दिली आहे. या कालावधीत कोणतेही कर्ज हे थकित किंवा बुडित असे निर्देशित करू नये, असे आरबीआयने बँकांसह फायनान्स कंपन्यांना आदेश दिले आहेत. मात्र, अनेक फायनान्स कंपन्या कर्जदारांचे धनादेश वटले नाही तर त्यावर दंड आकारतात.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव कीर्तिकुमार शिंदे म्हणाले, की कोरोना आणि टाळेबंदीचा प्रत्येकाच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. बजाज फायनान्स दंड आकारणार नसल्याने राज्यातील कर्जदारांचे ३८ ते ४७ कोटी रुपये वाचणार आहेत. त्यामुळे प्रत्येक कर्जदाराचे सुमारे ३ हजार २०० ते ४ हजार रुपये वाचणार आहेत.