नाशिक - काद्यांची मागणी वाढल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळी कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कांद्याला २ हजार ४०० रुपये प्रति क्विटंल हा या मोसमातील सर्वाधिक भाव मिळाला. किरकोळ बाजारपेठेत ३० ते ४० रुपये प्रति किलोने विकण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे.
पिंपळगाव बाजार समितीत किमान ९०० रुपये प्रति क्विटंल, कमाल २४०० रुपये तर सरासरी २२०० रुपये प्रति क्विटंल भाव मिळाला आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जयदत्त होळकर यांनी सांगितले की, सध्याचा कांद्याला मिळालेल्या भावामधून शेतकऱ्याचा फक्त खर्च निघत आहे.
मे महिन्यापासून साठवून ठेवलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा स्थितीत योग्य भाव मिळत असल्याने कांदा उत्पादकांनी समाधान व्यक्त केले आहे.
शहरी ग्राहकांना भाववाढीची झळ बसू नये म्हणून नाफेडची ५० मेट्रिक टनची खरेदी-
नाफेडणे एप्रिलमध्ये खरेदी केलेला कांदा शहरी भागांमध्ये पाठविला. यातून कांदा दरवाढीवर अंकुश ठेवण्याचा नाफेडने प्रयत्न केला. केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाअंतर्गत असलेल्या ग्राहक संरक्षण विभागाने कांद्याच्या दरवाढीची झळ शहरी ग्राहकांना बसू नये, यासाठी पन्नास हजार मेट्रिक टन कांद्याची खरेदी केली आहे.
नाफेडने लासलगाव बाजार समितीतून १५ एप्रिलला कांदा खरेदी करण्यास सुरुवात केली. नाफेडने लासलगाव, पिंपळगाव, बसवंत, कळवण, पुणे, अहमदनगर आणि इतर ठिकाणातून किंमत स्थिर निधीअंतर्गत कांदा खरेदी करून साठवलेला आहे. पन्नास हजार मेट्रिक टन कांद्याची खरेदी नाफेडच्या माध्यमातून करण्यात आली. सणासुदीच्या काळामध्ये कांदा भाववाढीवर अंकुश ठेवण्यासाठी नाफेडमार्फत कांदा शहरी भागात पाठविण्यास सुरुवात झाली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्याचे सरकारसमोर आव्हान -
शहरातील किरकोळ बाजारपेठेत कांद्याला प्रति किलो ३० ते ४० रुपये भाव मिळत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्याचे सरकारसमोर आव्हान असणार आहे. येत्या काही दिवसात मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होणार असल्याचे चित्र आहे. किरकोळ बाजारात ग्राहकांना कांदा जादा दराने खरेदी करावा लागणार आहे.
काद्यांला भाव मिळावा, सरकारने हस्तक्षेप करू नये अशी शेतकऱ्यांची अपेक्षा -
गेल्या अनेक महिन्यांपासून कांदा उत्पादक शेतकरी कमी भावामुळे रडकुंडीला आला होता. मात्र, आज मिळालेल्या भावामुळे कांदा ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणण्याची चिन्हे आहेत. जाधव या शेतकऱ्याने सांगितले की, ७ एकर शेतीमध्ये २०० क्विटंल कांद्याचे उत्पादन मिळाले आहे. त्यातील ५० क्विटंल कांदा खराब झाला आहे. उर्वरित कांद्याला भाव मिळावा, अशी अपेक्षा या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे. दुसऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याने सांगितले की, पुरामध्ये भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. कांद्याला भाव मिळत असताना त्यामध्ये सरकारने हस्तक्षेप करू नये.