हैदराबाद - देशात टाळेबंदी असताना तेलंगाणा सरकारने वाहनांचे शोरुम, वाहनांचे सुट्टे भाग विकणारे दुकाने आणि एसी विक्रीचे दुकाने आजपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील हैदराबादमध्ये केवळ चार भागात कोरोनाचे रुग्ण असल्याचे तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले.
तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी कोरोनाच्या सद्यस्थितीचा शुक्रवारी आढावा घेतला. या बैठकीमध्ये वाहन नोंदणी आणि रस्ते वाहतूक यंत्रणेची (आरटीए) कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेलंगणामधील उर्वरित टाळेबंदी कायम राहणार आहे. हैदराबादमधील चार झोन वगळता कोरोनाचे रुग्ण नसल्याचे के. चंद्रशेखर राव यांनी म्हटले आहे. हैदराबादमध्ये एलबीनगर, मलकपेठ, चारमिनार व कारवान या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आहेत. याद्रद्री भोंगिर, जानगाव आणि मंचेरिअल येथे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. मात्र, ते स्थलांतरित मजूर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे कोरोनाचे जिल्ह्यात रुग्ण आहेत, असे म्हणता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा-आंध्रप्रदेश सरकारचा ६ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना 'नारळ'
पुढे के. चंद्रशेखर राव म्हणाले, की कोरोनाबाबत काहीही घाबरण्याचे कारण नाही. बहुतांश लोक कोरोनापासून बरे होत आहेत. तर तेलंगणामध्ये कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण केवळ २.३८ टक्के आहे. त्यामुळे कोरोनामुळे घाबरण्याचे काहीही कारण नाही. हा कोरोना विषाणू आपल्यासोबत किती दिवस असेल, हे आम्हाला माहित नाही. त्यामुळे कोरोनासोबत जगण्यासाठी अनुकूलन करावे लागणार आहे. त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-तिसऱ्या टप्प्यातील आर्थिक पॅकेजचे उद्योगजगतासह पंतप्रधानांकडून स्वागत
केंद्र सरकारकडून १८ मेपासून सुरू होणाऱ्या चौथ्या टाळेबंदीसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर होण्याची शक्यता आहे.