नवी दिल्ली – कोरोनाच्या संकटापूर्वीच्या तुलनेत आता नोकरीसाठीच्या अर्जांचे प्रमाण वाढले आहे. ही माहिती ऑनलाइन नोकरीची वेबसाइट असलेल्या क्विकरने एका अहवालातून दिली आहे.
महानगरांमध्ये कोरोनाच्या संकटापूर्वीच्या तुलनेत आता नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्या तुलनेत बिगर महानगरांमधून नोकरीच्या अर्जांची संख्या वाढली नसल्याचे क्विकरने अहवालात म्हटले आहे.
डाटा एन्ट्री (115 टक्के), डिलिव्हरी बॉय (139 टक्के), वाहनचालक (122 टक्के), शिक्षक (108 टक्के), मार्केटिंग (179 टक्के), विक्री (187 टक्के) अशी नोकऱ्यांच्या अर्जात वाढ झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमान सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विदेशातील नोकऱ्यांसाठीच्या अर्जात 65 टक्के घट झाली आहे.
क्विकरने नोकरी देणाऱ्या कंपन्या आणि नोकरीसाठी करण्यात येणाऱ्या अर्जांचे विश्लेषण करून अहवाल तयार केला आहे. त्यामध्ये 16 मार्च ते 31 मेपर्यंतची आकडेवारीचा विचार करण्यात आला आहे. एप्रिलमध्ये नोकरीचे व अर्जाचे प्रमाण लक्षणीय कमी झाले होते. तर घरातून काम होऊ शकेल, अशा नोकऱ्यांना उमेदवार प्राधान्य देत असल्याचे क्विकरने अहवालात म्हटले आहे.
दरम्यान, कोरोनाचे संकट आणि टाळेबंदीमुळे अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात करून वेतनवाढ स्थगित केली आहे.