नवी दिल्ली - दूध व दुग्धजन्य पदार्थ बनवण्यात अग्रेसर असलेली अमुल कंपनी येत्या दोन वर्षात दूध प्रक्रिया केंद्रांसाठी १ हजार कोटी आणि खाद्यतेल व बटाटा उत्पादनांमध्ये ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. अमुल अंतर्गत काम करणाऱ्या गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड(जीसीएमएमएफ)चे व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सोढी यांनी याबाबत माहिती दिली.
जीसीएमएमएफला चालू आर्थिक वर्षात १२ ते १५ टक्के वाढीव नफ्याची अपेक्षा आहे. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीला ३७ हजार ५५० कोटी रुपयांचा नफा झाला होता. देशात कोरोना लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग-व्यवसाय विस्कटले आहेत मात्र, उच्च दर्जाच्या खाद्यपदार्थांच्या मागणीत वाढ झाल्याने अमुलला याचा नक्कीच फायदा होईल, असे सोढी यांनी सांगितले. खाद्यपदार्थांची वाढती मागणी बघूनच अमुलने विविध राज्यामध्ये दूध प्रक्रिया केंद्रे उभारण्यात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या दरदिवशी ३८० लाख लिटर दुधावर जीसीएमएमएफ प्रक्रिया करते. प्रक्रिया क्रेंद्रांची संख्या वाढल्यानंतर ४२० लाख लिटरपर्यंत दूध प्रक्रिया होईल, अशी माहिती सोढी यांनी दिली.
दूध प्रक्रियेसोबतच जीसीएमएमएफने मिठाई, बेकरी प्रोडक्टस् तयार करण्यास सुरुवात केली आहे. खाद्यतेल निर्मिती आणि बटाट्यापासून तयार केलेले खाद्यपदार्थ निर्मिती उद्योगातही जीसीएमएमएफने पाय ठेवणार आहे. 'जनमय' या नावाने खाद्यतेलांची निर्मिती होणार आहे. यात शेंगदाणा तेल, सरकीचे तेल, सूर्यफुल तेल, सोयीबीन तेल आणि मोहरीच्या तेलाचा समावेश आहे. गुजरातमधील शेतकऱयांना फायदा करून देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवूनच हा निर्णय घेतल्याचे आर. एस. सोढी यांनी सांगितले.