नवी दिल्ली - देशभरात टाळेबंदीने अनेक कंपन्यांमध्ये नोकऱ्यात कपात होत असताना दिलासादायक वृत्त आहे. अॅमेझॉन इंडियाने ५० हजार कर्मचारी हंगामीतत्वावर घेणार असल्याचे जाहीर केले. देशभरात टाळेबंदी असल्याने ऑनलाईन उत्पादनांची ग्राहकांकडून मागणी वाढत आहे. या मागणीची पूर्तता करण्यासाठी नवे कर्मचारी घेणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
अॅमेझॉनकडून फुलफिलमेंट सेंटरसह डिलिव्हरी नेटवर्कमध्ये कर्मचाऱ्यांना नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांना माल उचलणे, पॅक करणे आणि ग्राहकांपर्यत डिलिव्हरी करणे, अशी कामे दिली जाणार आहेत.
हेही वाचा-लाल चिखल! टोमॅटोचे दिल्लीसह प्रमुख महानगरात कोसळले दर
अॅमेझॉनचे वरिष्ठ अधिकारी अखिल सक्सेना म्हणाले, की ग्राहकांना हवे असलेल्या वस्तू देवून आम्ही मदत करणार आहोत. त्यामुळे ग्राहक प्रत्यक्षात शारीरिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) ठेवू शकणार आहेत. हे शक्य करण्यासाठी आम्ही ५० हजार नोकऱ्यांच्या संधी निर्माण करत आहोत. त्यांना महामारीच्या काळात सुरक्षित वातावरण उपलब्ध करून दिले जाणार आहे. ग्राहक, भागीदार आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी बांधील राहणार असल्याचेही अॅमेझॉनने म्हटले आहे.
हेही वाचा- दिलासादायक! रेल्वे तिकिटाचे आरक्षण सर्वांसाठी ऑनलाईनसह ऑफलाईन खुले