नवी दिल्ली- एअर इंडियाच्या वैमानिक संघटनेने विमान कर्मचाऱ्यांची छळवणूक होत असल्याचा आरोप केला आहे. असाच प्रकार सुरू राहिला तर दुसरे कोणतेही विमान उड्डाण करणार नाही असा वैमानिक संघटनेने एअर इंडियाच्या व्यवस्थापनाला इशारा दिला आहे.
एअर इंडियाची इंडियन कमर्शियल पायलट असोशियन आयसीपीए ही वैमानिकांची संघटना आहे. दिल्लीहून मास्कोला जाणाऱ्या वैमानिकाला कोरोना झाल्याचे लक्षात येताच हे विमान 30 मे रोजी माघारी बोलावण्यात आले होते. हा दिवस कर्मचाऱ्यांसाठी खूप वेदनादायी होता, असे वैमानिक संघटनेने म्हटले आहे. विमान कर्मचाऱ्यांना कोणत्याही सुविधा आणि अन्नशिवाय दिवसभर थांबून रहावे लागले, असे संघटनेने म्हटले आहे.
वंदे भारत मिशनमधील विमान कर्मचाऱ्यांचे नियमानुसार कोराना चाचणी करण्यात दिल्ली विमानतळाचे आरोग्य अधिकारी अयशस्वी ठरले आहेत. याविषयी पत्र वैमानिक संघटनेने एअर इंडियाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना लिहिले आहे.
विमानतळावरील आरोग्य अधिकाऱ्यांनी विमान कर्मचाऱ्यांचा छळ केल्याचा संघटनेने आरोप केला आहे. कर्मचाऱ्यांना 14 दिवस संस्थात्मक विलगीकरणाची सुविधा आरोग्य अधिकाऱ्यांनी देण्यास नकार दिला. या कर्मचाऱ्यांना घरातच 14 दिवस विलगीकरणात राहण्यास सांगितले आहे. यातून नियमांचे पालन झाले नाही. केंद्रीय गृह मंत्रालय, आरोग्य मंत्रालय व नागरी विमान वाहतूक मंत्रालय यांच्यात समन्वय दिसत नाही, असे वैमानिक संघटनेने एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, विदेशात अडकलेल्या भारतीयांना आण्ण्यासाठी व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी एअर इंडिया सध्या मोलाची कामगिरी बजावत आहे.