नवी दिल्ली - केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एअर इंडियाबाबत घेण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण निणर्याची राज्यसभेत माहिती दिली. खासगीकरणासाठी एअर इंडियाचा लिलाव करण्यात येत आहे. हा लिलाव अयशस्वी झाला तर एअर इंडिया बंद करण्यात येणार असल्याचे हरदीप सिंग पुरी यांनी सभागृहात सांगितले.
एअर इंडियामधील सर्व हिस्सा विकण्यासाठी केंद्र सरकार कागदपत्रांची तयारी करत असल्याचे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग यांनी सांगितले. एअर इंडियातील निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 मार्च ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आलेली आहे.
हेही वाचा-पुण्यातील स्कोडा फॉक्सवॅगनचा उत्पादन प्रकल्प एक महिना राहणार बंद
गेल्या आठवड्यात मंत्रिगटाची एअर इंडियाबाबत बैठक झाली. त्यामध्ये काही निर्णय घेण्यात आले. यापूर्वी सरकारने एअर इंडियाला 30 हजार कोटींचे पॅकेज दिले होते, अशी हरदीप सिंग यांनी राज्यसभेत माहिती दिली.
हेही वाचा-ऑनलाईन खरेदी पडली महागात; 800 रुपयाच्या कुडत्याला मोजावे लागले 80 हजार
यापूर्वी मोदी सरकारने मे 2018 मध्ये एअर इंडियामधील हिस्सा खरेदी करण्यासाठी इच्छुकांचे एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मागविले होते. मात्र, कोणत्याही कंपनीने एअर इंडियामधील हिस्सा खरेदी करण्यासाठी रस दाखविलेला नाही.