नवी दिल्ली – एअर इंडियाने वंदे भारत मिशनच्या पाचव्या टप्प्याची आज सुरुवात केली आहे. या टप्प्यात 53 देशांदरम्यान 700 विमाने उड्डाणे होणार असल्याची एअर इंडियाची अपेक्षा आहे.
वंदे भारत मिशनच्या चौथ्या टप्प्यात एअर इंडियाच्या 617 विमानांची उड्डाणे झाली होती. त्यामधून 1 लाख 10 हजार 383 प्रवाशांना विदेशातून भारतात आणण्यात आले आहे. एअर इंडियाची कंपनी असलेल्या इंडिया एक्सप्रेसकडून पाचव्या टप्प्यात 1.2 लाख भारतीयांना मायदेशी आणण्यात येईल, असा अंदाज सूत्राने व्यक्त केला.
एअर इंडियाकडून उत्तर अमेरिकेसह इंग्लंड, कॅनडा आणि हाँगकाँगच्या मार्गावरही विमान वाहतूक सेवा देण्यात येणार आहे. एअर इंडियाने 30 जुलैपर्यंत 53 देशांमधून 1 हजार 461 विमानांची उड्डाणे केली आहेत. त्यामधून 2 लाख 71 हजार 910 हून अधिक प्रवाशांना मायदेशी आणले आहे. एअर इंडियाने 7 मे रोजी वंदे भारत मोहिमेला सुरुवात केली होती. देशात एअर इंडियाची विमान वाहतूक सेवा सुरू आहे.