नवी दिल्ली - निवडणुकीच्या तोंडावर गेल्या तीन आठवड्यांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थितर राहिल्या आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी इंधनाचे दर वाढविले नसल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे.
पेट्रोलचा दर दिल्लीत प्रति लिटर ९१.१७ रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर ८१.४७ रुपये आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिले आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी इंधनाचे दर स्थिर ठेवल्यानंतरही देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर १०० रुपयांहून अधिक आहेत. विशेषत: राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशमधील काही शहरांमध्ये पेट्रोलचे दर १०० रुपयांहून अधिक आहेत.
हेही वाचा-टीसीएसकडून कोरोना महामारीतही कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा वेतनवाढ
केंद्र सरकार पेट्रोलियम उत्पादनांवरील कर कपातीबाबत विचार करण्यास तयार असल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी संसदेमध्ये बोलताना सांगितले. फेब्रुवारीमध्ये कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ७ डॉलरने वाढले आहेत. फेब्रुवारीमध्ये सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोलचे दर एकूण प्रति लिटर ४.२२ रुपयांनी तर डिझेलचे दर एकूण ४.३४ रुपयांनी वाढले आहेत.
हेही वाचा-विमान प्रवास महागणार; तिकिटावरील किमान दराची अट ५ टक्क्यांनी शिथील
निवडणुकीमुळे इंधन दरवाढीला 'ब्रेक'
- गेल्या सहा दिवसांमध्ये कच्च्या तेलाचा दर ६ टक्क्यांनी कमी झाले आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ६४.५ डॉलर आहेत.
- वर्ष २०२१ मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती २६ वेळा वाढलेल्या आहेत. या दरवाढीनंतर पेट्रोलचा दर प्रति लिटर ७.४६ रुपये तर डिझेलचे दर ७.६० रुपयांनी वाढले आहेत.
- सरकारी तेल कंपन्यांना पेट्रोलच्या किरकोळ विक्रीत प्रति लिटर २ रुपये तर डिझलेच्या किरकोळ विक्रीत प्रति लिटर ४ रुपये नुकसान होत आहे.
- सरकारी तेल कंपनीमधील अधिकाऱ्याच्या माहितीनुसार इंधनाच्या किरकोळ विक्रीत पुन्हा दर वाढण्याची शक्यता आहे. मात्र, विविध राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांमधील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर इंधनाचे दर वाढणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
- यापूर्वी पेट्रोल व डिझेलच्या किमतीमध्ये २७ फेब्रुवारीला बदल करण्यात आला होता. याचदिवशी भारतीय निवडणूक आयोगाने आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पाँडेचरी या राज्यांसाठी निवडणूक जाहीर केल्या होत्या.