मुंबई - केंद्र सरकारने कर्जफेडीसाठी दिलेल्या सहा महिन्यांच्या मुदतवाढीतील चक्रवाढ व्याज माफ करण्याच्या निर्णयातून कृषी कर्जाला वगळले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक कर्ज, ट्रॅक्टरवरील कर्ज आणि इतर कृषी कर्जावरील चक्रवाढ व्याज माफ होणार नाही.
केंद्रीय वित्तसेवा विभागाने कर्जफेडीच्या मुदतवाढीतील चक्रवाढ व्याजमाफीबाबतची माहिती दिली आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार कृषी आणि जोडधंद्याशी संबंधित कर्ज हे चक्रवाढ व्याजमाफीसाठी पात्र नाही. केंद्र सरकारने १ मार्च ते ३१ ऑगस्ट २०२० मध्ये कर्जदारांचे चक्रवाढ व्याज म्हणजे व्याजावरील व्याज माफ केले आहे. यामध्ये २ कोटीपर्यंतच्या वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज व गृहकर्ज आदींचा समावेश आहे. कर्जदारांकडून घेतलेले चक्रवाढ व्याज हे ५ नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले होते निर्देश
सर्वोच्च न्यायालयाने चक्रवाढ व्याजावरील सुनावणीत दिवाळी तुमच्या हातात आहे, असे सरकार आणि आरबीआयच्या वकिलाला म्हटले होते. यावर पुढील सुनावणी सर्वोच्च न्यायालय २ नोव्हेंबरला घेणार आहे. त्यानंतर यासंदर्भात पुढील निर्णय होणार आहेत.