दिलासा..! 3,500 रेमडेसीवीर इंजेक्शन हैदराबादवरून आज रात्री मुंबईत येणार - रेमडेसीवीर इंजेक्शन
हैदराबादवरून इंजेक्शनचा साठा आल्यानंतर उद्यापासून इंजेक्शनचे वाटप मागणीनुसार रुग्णालयात करण्यात येणार आहेत. ही माहिती मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.

मुंबई - कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर रेमडेसीवीर इंजेक्शन प्रभावी ठरत आहे. त्यामुळे या इंजेक्शनची मागणी प्रचंड वाढली आहे. मुंबई महापालिकेने तुटवडा होण्यापूर्वीच 15 हजार इंजेक्शनची ऑर्डर दिली आहे. हे 3 हजार 500 हून अधिक इंजेक्शन हैदराबादवरून आज रात्री विमानाने मुंबईत पोहोचणार आहेत.
येत्या काळात रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडाही निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, मुंबईतील कोव्हिड रुग्णालयात या इंजेक्शनची टंचाई भासणार नाही. हैदराबादवरून इंजेक्शनचा साठा आल्यानंतर उद्यापासून इंजेक्शनचे वाटप मागणीनुसार रुग्णालयात करण्यात येणार आहेत. ही माहिती मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे. तर एकूण रेमडेसीवीरची 15 हजार इंजेक्शनची ऑर्डर हैदराबादमधील एका औषध उत्पादक कंपनीला देण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील 25 टक्के इंजेक्शन आज येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रेमडेसीवीर प्रभावी ठरत आहे. त्यामुळे अमेरिकेसह अनेक देशात या इंजेक्शनचा वापर वाढला आहे. त्यामुळे मागणी ही वाढली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी देशातील काही कंपन्याना या इंजेक्शनच्या उत्पादनाची परवानगी दिली आहे. यात हैदराबादमधील हेट्रो हेल्थ केअर कंपनीचाही समावेश आहे. त्यानुसार पालिकेने या कंपनीकडून 15 हजार रेमडेसीवीर इंजेक्शन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यातील 25 टक्के अर्थात 3 हजार 500 हून अधिक औषधांचा साठा मुंबई कार्गोला आज दाखल होणार आहे.
मुंबईतील सर्व पालिका रुग्णालयाकडून या इंजेक्शनची मागणी आली आहे. त्यानुसार उद्यापासूनच रुग्णालयात इंजेक्शनचे वाटप करण्यात येणार आहे असे काकाणी यांनी स्पष्ट केले आहे. सध्या या इंजेक्शनचा तुटवडा नाही. पण याची मागणी वाढती आहे. एका इंजेक्शनची किंमत 5 हजार 400 रुपये इतकी आहे. पण एकाचवेळी 15 हजार इंजेक्शन थेट कंपनीकडून खरेदी करणार असल्याने एक इंजेक्शन 4, 144 रुपये किमतीत उपलब्ध झाले आहे. त्यामुळेच ही ऑर्डर दिल्याचे अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी सांगितले आहे. तर मोठ्या संख्येने इंजेक्शन उपलब्ध झाल्याने गरजेप्रमाणे तात्काळ रुग्णावर उपचार करता येणार आहे. त्यामुळे ही कोरोना बाधित रुग्णांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे. दरम्यान, देशात सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या मुंबईत आहे.