नवी दिल्ली - देशात इंधनाच्या किमती जवळपास दोन आठवडे 'जैसे थे' राहिल्या आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर अस्थिर राहूनही सरकारी कंपन्यांनी कच्च्या तेलाचे दर वाढविले नाहीत.
पेट्रोलचा दर दिल्लीत प्रति लिटर ९१.१७ रुपये आहे. तर डिझेलचे दर प्रति लिटर ८१.४७ रुपये आहे. गेली १३ दिवस देशभरात कच्च्या तेलाचे दर बदलण्यात आले नाहीत. मात्र, असे असले तरी देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर १०० रुपयांहून अधिक आहेत.
हेही वाचा- सॅमसंग गॅलक्सी एम १२ भारतात लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये
फेब्रुवारीमध्ये कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ७ डॉलरहून अधिक झाले आहेत. तर सरकारी तेल कंपन्यांनी फेब्रुवारीत चौदा वेळा इंधनाचे दर वाढविले आहेत. या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर ४.२२ रुपयांनी तर डिझेलचे दर प्रति लिटर ४.३४ रुपयांनी वाढले आहेत. सध्या, कच्च्या तेलाचे दर जागतिक बाजारात प्रति बॅरल सुमारे ६९.५ डॉलर आहेत.
हेही वाचा-एलईडी टीव्हीच्या एप्रिलमध्ये वाढणार किमती
२०२१ मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सव्वीस वेळा वाढविण्यात आल्या आहेत. पेट्रोलचे दर प्रति लिटर ७.४६ रुपये तर डिझेलचे दर ७.६० रुपयांनी वाढविले आहेत.
निवडणुकांमुळे सरकारचे इंधन दरवाढीवर नियंत्रण-
देशातील चार राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशाची निवडणुका असल्याने नागरिकांची इंधनाच्या दरवाढीपासून काही काळ सुटका झाली आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेप्रमाणे सरकारी कंपन्यांना इंधनाचे दर कमी अथवा वाढविण्यासाठी कोणतेही बंधन लागू होत नाही. मात्र, निवडणुकीच्या काळात इंधनाचे दर केंद्र सरकारकडून स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचे यापूर्वी दिसून आले आहे.