बंगळुरू - इंग्लंडमध्ये ३० मेपासून सुरू होणाऱ्या विश्वकरंडकात भारतीय क्रिकेट संघ मजबूत आहे. यंदाच्या विश्वकरंडकात भारतीय संघ बाजी मारेल, असा विश्वास संघातील युवा फिरकीपटू युझवेंद्र चहल याने व्यक्त केला आहे. डीएव्ही प्रशालेतील खेळाडूंना मार्गदर्शनपर सोमवारी आयोजित एका कार्यक्रमात तो बोलत होता.
युझवेंद्र विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाला, आपण जे करू इच्छिता ते मनापासून करा. अधिकारी व्हायचे असेल तर अभ्यासात स्वत:ला झोकून देऊन अभ्यास करा. कोणतेही प्रयत्न कमी नकोत. मनापासून प्रयत्न केले, तर यश तुमच्यापर्यंत लोळण घेत येईल.
यंदाच्या आयपीएलमध्ये चहल हा आरसीबीच्या संघात खेळत होता. आरसीबीचा संघ हा आठव्या क्रमांकावर राहिला आहे. सध्या तो विश्वकरंडकाच्या तयारीत व्यस्त आहे.
चहलने आयपीएल २०१९ मध्ये आरसीबी संघाकडून खेळताना १४ सामन्यात १८ गडी बाद केले. तर ४१ आंतरराष्ट्रीय सामन्यात ७२ गडी बाद केले आहेत. विश्वकरंडकात भारतीय गोलंदाजीची मदार कुलदीप आणि चहलच्या खांद्यावर आहे.