मुंबई - युवराज सिंग हा २०११ च्या विश्वचषक विजयाचा हिरो आहे. त्याने विश्वचषकासंदर्भात भारतीय संघ आणि एका खेळाडूसंदर्भात भविष्यवाणी केली आहे. हार्दिक पंड्या यंदाच्या विश्वचषकात सुरेख कामगिरी करेल आणि त्याची फलंदाजी संघास उपयुक्त ठरेल, असे युवीने म्हटले आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये पंड्याने त्याच्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर साऱ्यांचीच मने जिंकली आहेत.
युवराज म्हणाला, मी काल हार्दिकशी बोललो की तुला यंदाच्या विश्वचषकात छाप सोडायची सुवर्णसंधी आहे. आयपीएलमधील तुझा हा फॉर्म असाच कायम राहिल, अशी मला आशा आहे. हार्दिकची कोलकाता नाईट रायडर्सविरूद्धची ९१ धावांची खेळी ही त्याची सर्वोत्कृष्ट खेळी असल्याचेही युवराजने म्हटले आहे.
फलंदाजास ज्या प्रकारची लय हवी असते अगदी तशीच लय पंड्याला मिळाली आहे. मी सराव सामन्यापासून त्याला पाहतो. तो गोलंदाजावर योग्यवेळी प्रहार करतो. त्याचा उत्तम फॉर्म संघासाठी उपयुक्त असल्याचे पंड्याने सांगितले.
युवराजने यंदाच्या विश्वचषकात भारतासह, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघही फेव्हरिट असल्याचे सांगितले आहे. डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ यांच्या परतण्याने ऑस्ट्रेलिया संघ मजबूत वाटत आहे. विंडीजकडेही चांगले फलंदाज असल्याचे युवराजने म्हटले आहे.
भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव हा लवकरच फॉर्मात येईल. तो भारताचा सध्याचा चांगला गोलंदाज आहे. त्याने इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. तोही या विश्वचषकात छाप पाडेल, असे भाकीत युवराजने केले आहे.