मुंबई - ग्रामीण भागातील तब्बल 10 लाखाहून अधिक महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नव तेजस्वीनी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिला बचत गटांना ५२३ कोटी देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.
ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण विकास प्रकल्प ही योजना राज्यभरात राबवली जाणार आहे.तर राज्यात ही योजना महिला आर्थिक विकास महामंडळाकडून राबवली जाणार असल्याची माहितीही ठाकूर यांनी यावेळी दिली.
ग्रामीण भागात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाविकास आघाडीने हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून याद्वारे तब्बल १० लाख कुटुंब दारिद्र्यरेषेतून बाहेर येतील, अशी माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, जे पिकेल ते विकेल ही मुख्यमंत्र्यांची संकल्पना असून त्या संकल्पनेनुसार ग्रामीण भागातील महिला बचत गटांना बळकट करण्यासाठी त्यांच्या कंपन्या, औद्योगिक संस्था यांना अधिक सक्षम करणे यासाठीचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. याच माध्यमातून राज्यात सक्षम महिला सदृढ बालक यांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्या म्हणाल्या. यामुळे महिला खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्टया सक्षम होणार असून सामाजिक विकास होईल असेही त्या म्हणाल्या.