जालना- 8 दिवसापूर्वी एका दोन दिवसाच्या चिमुकलीला जन्म देऊन बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह शहराजवळील सिल्लोड रोडवरील एका शेतातील विहिरीत आढळून आला आहे. त्यामुळे, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अश्विनी बावसकर असे मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील देहेड येथील गणेश बावस्कर हे कामानिमित्त पत्नी अश्विनी बावस्कर हिच्यासोबत पुणे येथे वास्तव्यास होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन ते चार महिण्यांपासून ते देहेड येथे आलेले होते. आश्विनी ही गर्भवती असल्यामुळे ती बाळंतपणासाठी वालसा डावरगाव येथे माहेरी आली होती. तिला 10 जुलै रोजी प्रसुतीसाठी भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रसुतीनंतर तिने एका मुलीला जन्म दिला. मात्र बाळाचे वजन कमी असल्याने, शिवाय ते आईचे दूध पीत नसल्याने बाळाला 12 जुलै रोजी शहरातील एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.
13 जुलैला, मुलीला दूध पाजून येते, असे म्हणून अश्विनी ग्रामीण रुग्णालयातून जवळच असलेल्या खाजगी रुग्णालयापर्यंत आली व बाळाला दूध न पाजताच बेपत्ता झाली होती. त्यानंतर नातेवाईकांनी तिचा दोन दिवस शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. त्यामुळे 15 जुलैला अश्विनी गायब झाल्याची तक्रार भोकरदन पोलीस ठाण्यात देण्यात आली होती.
दरम्यान, शनिवारी सायंकाळी ६ वाजता अश्विनी बावस्कर हिचा मृतदेह शहराजवळील सिल्लोड रोडवरील पेट्रोल पंपाजवळ रोडलगत असलेल्या जाधव यांच्या शेतातील विहिरीत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे अधिकारी वैभव पुणेकर, भूषण पळसपगार, राईस कादरी व शशिकांत सरकटे, यांच्यासह व्ही.गवते, बी घुळेकर, परसराम ढोके, सिंधू गायकवाड यांनी मिळून मृतदेह बाहेर काढला. दरम्यान, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे हे सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहोचले. महिलेचा मृतदेह विहिरीबाहेर काढल्यानंतर त्यास उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे करत आहे.