सातारा- राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील यांनी आज पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. साताराच्या जनतेने खासदारांवर टाकलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्यासाठी त्यांच्यासाेबत पूर्ण वेळ कार्यरत राहण्याचा निर्धार सांरग यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत व्यक्त केला. दरम्यान आपल्या निर्णायबाबत पक्षश्रेष्ठींना कळविल्याचे त्यांनी नमूद केले.
पाटील म्हणाले, पुणे पदवीधर मतदारसंघात उच्चांकी मतदार नोंदणी आपण केली आहे. ऑफलाईन व ऑनलाईन नोंदणीत आपणच अव्वल क्रमांकावर आहोत. मात्र पुणे पदवीधर मतदार संघातून निवडणूक न लढविण्याचा निर्णय मी घेतला आहे. त्याबाबत 10 जुलै रोजीच निर्णय झाला आहे. त्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही कळविलेले आहे. कोरोनाची स्थिती पाहता अधिक काळ ताटकळत राहण्यापेक्षा सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी खासदार पाटील यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी त्यांचा मुलगा व राष्ट्रवादीचा पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार आहे, असे सारंग पाटील यांनी सांगितले.
कोरोनामुळे स्थिती अत्यंत बिकट आहे. त्या स्थितीचा विचार करून निर्णय घेत आहो. जून अखेरीस होणाऱ्या निवडणुकीबाबत अद्याप काहाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे त्यात अधिक गुंतून राहण्यापेक्षा सातारा जिल्ह्यात कार्यरत राहणेच योग्य वाटल्याने माघारीचा निर्णय घेत आहे. निवडणुकीत माघार घ्यावी, यासाठी पक्षातून कोणताही दबाव नाही. कोणीही सांगितलेले नाही किंबहुना पक्षात पुणे पदवीधरबाबत कसलीच चर्चा नाही. त्यामुळे पूर्ण विचार करूनच निर्णय घेत आहे, असे सारंग पाटील म्हणाले.
तसेच, हा निर्णय पक्षाला कळवून उमेदवारी न देण्याची विनंतही केली आहे. राष्ट्रवादीतून ज्याला पुणे पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार म्हणून जाहीर केले जाईल, त्याच्या मागे खंबीरपणे उभा राहण्याची माझी भुमिका राहील. माझ्यासोबत पाचही जिल्ह्यात ज्या लोकांनी काम केले आहे. त्या सगळ्यांना विश्वासात घेवून निर्णय घेत असल्याचे सारंग पाटील म्हणाले.