सिंधुदुर्ग - कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा केली आहे. त्यामुळे मत्स्यशेतीच्या माध्यमातून कोकणाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी राज्यमंत्री आमदार रविंद्र चव्हाण यांनी सांगितले. चव्हाण यांनी मालवण तालुक्यातील तळाशील, आचरा आणि कांदळगाव येथील कृत्रिम मत्स्यपालन प्रकल्पांचा अभ्यास दौरा केला.
दौऱ्यात चव्हाण यांनी सदर भागातील मत्स्यपालन प्रकल्पांची पाहणी केली. यावेळी आचरा सरपंच प्रणया टेमकर, तोंडवळी सरपंच आबा कांदळकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार चव्हाण म्हणाले, कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून आत्मनिर्भर योजना जाहीर केली आहे. तर मत्स्यशेतीच्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांमध्ये समृद्धी आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच निलक्रांती सारखी योजना जाहीर केली आहे. त्याला अधिक बळ दिले जाणार असल्याचे ते म्हणाले. आज मुंबईतून मोठ्या प्रमाणात नागरिक कोकणात आले आहेत. त्यांना याठिकाणीच रोजगार उपलब्ध करून दिल्यास कोकणातील ओस पडलेली घरटी पुन्हा बहरू लागतील. त्यामुळे इकडच्या घरांचे घरपण टिकून राहणार असून त्या दृष्टीने मोदी सरकारचे नियोजन सुरू असल्याचे ते म्हणाले.
तसेच, मत्स्यशेतीचे प्रकल्प राबवण्यासाठी प्रयत्न केले जातील. अशा कृत्रिम तलावांचा शोध घेतला जात असून आतापर्यंत 10 ते 15 ठिकाणे मत्स्य शेतीसाठी निश्चित करण्यात आली आहेत. केंद्र सरकारच्या माध्यमातून याठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिल्यास येत्या काळात कोकण समृद्धीच्या दिशेने मार्गक्रमण करेल, असा विश्वास रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.