अकोला- राजगृह येथील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज वंचित बहूजन आघाडी अकोला जिल्ह्याची निषेध सभा जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या निवासस्थानी संपन्न झाली. यावेळी निषेध सभेत आरोपी अटक होईपर्यंत शांतता प्रस्थापित करून त्यानंतर पुढील आंदोलन जाहीर करण्याचे ठरविण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह या निवासस्थानी तोडफोड झाल्याची घटना काल सायंकाळी घडली. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीतर्फे सावध भूमिका घेण्यात आली. प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. तर अकोला जिल्हा वंचित बहुजन आघाडीने यासंदर्भात निषेध सभा घेत या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई शासनाने करावी, अशी मागणी केली.
यावेळी राज्य प्रवक्ते राजेंद्र पातोडे, राज्य प्रवक्ते डाॅ. धैर्यवर्धन फुंडकर, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, भारिपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाठ, जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभाताई भोजने यांच्यासह आदी उपस्थित होते.