सोलापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वटपोर्णिमाचा सण घरातच साजरा करण्याचे आवाहन सोलापुरातील चौपाड विठ्ठल मंदिराने परिसरातील महिलांना केले होते. तशी सूचना असलेला फलकही वडाच्या झाडाला लावण्यात आला होता. परंतु, महिलांनी या सूचना फलकालाच दोऱ्याने गुंडाळल्याचे चित्र पाहायला मिळाले. 'घरातच वटपोर्णिमा साजरी करा' अशी सूचना करणारा फलकच महिलांनी दोऱ्यांच्या फेऱ्यात गुंडाळून टाकला.
शहरातील मूळ गावठाण असलेल्या चौपाड भागातील विठ्ठल मंदिराच्या बाहेर वडाचे झाड आहे. दरवर्षी, या वटपौर्णिमेला महिला या वडाच्या झाडाची पूजा करतात. विठ्ठल मंदिरात ही वटपौर्णिमा मोठ्या भक्ती भावाने साजरी केली जाते. मात्र, यावर्षी कोरोनाचे संकट असल्यामुळे महिलांनी घरातच राहून वटपोर्णिमा साजरी करण्याची सूचना चौपाड विठ्ठल भजनी मंडळाच्यावतीने करण्यात आली होती. तशी सूचना असलेला फलक मंदिराच्या बाहेर लावण्यात आला होता. मात्र, सकाळपासूनच महिलांना वटपौर्णिमेनिमित्त विठ्ठल मंदिरात वडाची पूजा करण्यासाठी गर्दी केली होती. मात्र, महिलांनी सूचना फलकालाच दोऱ्याने वडाच्या झाडाभोवती दोऱ्याने गुंडाळून टाकले.
दरम्यान, सूचना फलक दोऱ्याच्या फेऱ्यात गुंडाळला गेल्याचे लक्षात आल्यानंतर याठिकाणी गर्दी होऊन कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला. काही वेळासाठी एका पोलीस कर्मचाऱ्यालाही वडाच्या झाडापाशी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.