वॉशिंग्टन डी. सी - अमेरिका भारत आणि चीन दोघांसोबत चर्चा करत असून सीमा वाद सोडविण्यासाठी मदत करण्यास तयार असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी म्हटले आहे. ही खुप कठीण परिस्थिती आहे. आम्ही भारत आणि चीन दोघांशीही बोलत आहोत, असे ट्रम्प म्हणाले.
दोन्ही देशांमध्ये मोठी अडचण निर्माण झाली आहे. ते एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. आम्ही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे भारत चीन वादाबाबत पत्रकारांनी विचारले असता ट्रम्प यांनी वक्तव्य केले आहे. कोरोना संकटानंतर आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या निवडणूक रॅलीसाठी ट्रम्प ओक्लोहोमा राज्यात आज गेले आहेत.
पूर्व लडाख भागातील गलवान व्हॅली भागात चीनने नियंत्रण रेषेचे उल्लंघन करत भारतीय भूमीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या हाणामारीत 20 भारतीय जवान हुतात्मा झाले. त्यानंतर चिनी लष्कराच्या घुसखोरीला विरोध करत अमेरिका भारताच्या पाठिशी उभा राहिला आहे. अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या म्हणण्यानुसार 35 चिनी सैनिक मारले गेल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
भारताबरोबर आणि इतर शेजारी देशांबरोबर चीन सीमा वाद वाढवत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. तसेच कोरोना संकटाशी सामना करत असताना या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न चीनकडून केला जात असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
देशातली सर्वात मोठ्या लोकशाही देशाबरोबर चीन सीमा वाद वाढत आहे. दक्षिण चीनी समुद्रात चीनकडून लष्कर वाढविण्यात येत आहे, तसेच अनधिकृतरित्या चीन जमिनीवर दावा सांगत आहे. त्यामुळे महत्वाच्या समुद्र मार्गाला धोका निर्माण झाला आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माईक पोम्पेओ यांनी वक्तव्य केले आहे.