मुंबई- कोरोना विषाणूचे रुग्ण मुंबईत दिवसेंदिवस वाढत असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत विविध उपाय योजना प्रशासकीय स्तरावर केल्या जात आहेत. राज्यात लॉकडाऊनचा 5 वा टप्पा सुरू झाला असून 30 जून पर्यंत वाढवला गेला आहे. लॉकडाऊनमध्ये आता पर्यंत मास्क न वापरणाऱ्या 3 हजार 374 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. कोरोना रुग्णांची वाढ पाहता मुंबई शहर व उपनगरात कलम 144 ही 15 जुलै पर्यंत लागू करण्यात आलेली असून यात अत्यावश्यक सेवेतील गोष्टींना सूट देण्यात आली आहे.
20 मार्च ते 30 जून या दरम्यान शहरात विविध ठिकाणी संचार बंदीचे उल्लंघण करणाऱ्या 12 हजार 11 प्रकरणात तब्बल 24 हजार 956 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संचारबंदी नियमांचे उल्लंघन करणार्या 3 हजार 141 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असून तब्बल 7 हजार 320 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे, तर 14 हजार 135 आरोपींना जामिनावर पोलिसांनी सोडून दिलेले आहे.
लॉकडॉउन काळामध्ये कलम 188 नुसार मुंबईतील दक्षिण मुंबईत 1 हजार 221 गुन्हे दाखल करण्यात आले असून, मध्य मुंबईत 2 हजार 293 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तर पूर्व मुंबईत तब्बल 2 हजार 56 गुन्हे दाखल झाले आहेत. तर पश्चिम मुंबईत 2 हजार 167, उत्तर मुंबईत 4 हजर 274 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. हे गुन्हे कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संदर्भात, विनापरवानगी दुकान किंवा हॉटेल उघडी ठेवण्यासंदर्भात, पानटपरी, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे व अवैध वाहतूक प्रकरणी नोंदविण्यात आले आहेत.
गेल्या 24 तासात मुंबईत 406 गुन्हे पोलिसांनी कलम 188 नुसार नोंदविले असून यात सर्वाधिक 131 गुन्हे उत्तर मुंबईत नोंदविण्यात आले आहेत. या खालोखाल दक्षिण मुंबईत केवळ 132 गुन्हे, मध्य मुंबईत 43, पूर्व मुंबईत 82, पश्चिम मुंबईत 18 अशा गुन्ह्यांची नोंद झाली आहे.