भंडारा - जिल्ह्यात मंगळवारी पुन्हा 2 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे दोन्ही रुग्ण पवनी तालुक्यातील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 41 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर सद्यस्थितित 12 कोरोना अॅक्टीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या 53 एवढी झाली आहे. तर भंडारा आणि मोहाडी या दोन ठिकाणी नवीन प्रतिबंधित क्षेत्र स्थापन करण्यात आले आहेत.
मंगळवारी पॉझिटिव्ह आढळून आलेले दोन्ही रूग्ण हे पवनी तालुक्यतील असून एक 22 वर्षीय तरुण हा मुंबई वरून 15 जूनला तर 35 वर्षीय तरुण पुणे येथून 14 जूनला पवनी येथे आले होते. दोघांच्याही घशाच्या स्त्रावाचे नमुने तपासणी साठी पाठविले असता 16 जूनला त्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 53 रूग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी भंडारा तालुक्यात 7, साकोली 20, लाखांदूर 14, तुमसर 1, मोहाडी 2, पवनी 6 अशी बाधितांची संख्या आहे.
14 जूनला मिळालेल्या मोहाडी आणि भंडारा तालुक्यतील दोन्ही कोरोनाबाधित रूग्ण हे घरीच विलगीकरणात होते. त्यामुळे मोहाडी तालुक्यातील काही भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून तर भंडारा तालुक्यातील साहुली गावालाही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. आतापर्यंत 3015 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्यापैकी आतापर्यंत 53 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर 2958 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अद्याप चार नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला नाही आहे. मंगळवारी (16 जून) अलगीकरण कक्षात 15 व्यक्ती भरती झाल्या असून आतापर्यंत 409 व्यक्तींना अलगीकरण कक्षातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोविड केअर सेंटर साकोली, तुमसर आणि मोहाडी येथे 442 जण भरती आहेत. 2161 व्यक्तींना रुग्णालय विलगीकरणातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, पुणे, मुंबई आणि इतर राज्यातून 42084 व्यक्ती भंडारा जिल्ह्यात आले असून 36098 व्यक्तींचा 28 दिवसांचा गृह विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच अन्य ठिकाणाहून आलेल्या 5986 व्यक्तींनाही गृह विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्यांनी घरामध्येच रहावे, घराबाहेर पडू नये अशा सक्त सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.