भंडारा - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच आहे. असे असले तरी जिल्ह्यात रविवारी 2 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर दिवसभरात 2 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आढलळेल्या रुग्णांपैकी एक रूग्ण मोहाडी आणि दुसरा भंडारा तालुक्यातील आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 41 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या जिल्ह्यात एकूण 10 अॅक्टिव्ह कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण उपचार घेत आहेत. तर जिल्ह्यात आतापर्यंत 51 कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, मोहाडी तालुक्यातील 40 वर्षीय व्यक्ती 9 जूनला सुरत वरून आला होता. त्याला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. तर भंडारा तालुक्यातील रूग्ण 8 जूनला उत्तर प्रदेश वरून आला होता. त्यालाही विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. या दोन्ही व्यक्तीचे अहवाल रविवारी (14 जून) पॉझिटिव्ह आले आहेत.
आतापर्यंत 2835 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत 51 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 2685 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यापैकी 100 नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे. रविवारी अलगीकरण कक्षात 14 व्यक्ती भरती असून आतापर्यंत 404 व्यक्तींना अलगीकरण कक्षातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोविड केअर सेंटर साकोली, तुमसर आणि मोहाडी येथे 302 रूग्ण भरती आहेत. 2149 व्यक्तींना रुग्णालयातील विलगीकरण कक्षातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे, मुंबई आणि इतर राज्यातून 41774 व्यक्ती भंडारा जिल्ह्यात आले असून 34563 व्यक्तींचा 28 दिवसांचा गृह विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच अन्य ठिकाणाहून आलेल्या 7211 व्यक्तींचे घरातच विलगीकरण करण्यात आले आहे. त्यांनी घरामध्येच रहावे, घराबाहेर पडू नये अशा सक्त सूचना प्रशासनाने त्यांना दिल्या आहेत.