परभणी : जिल्ह्यातील अत्यवस्थ कोरोनाबधितांसाठी 27 व्हेंटिलेटरची उपलब्धता झाली आहे. हे व्हेंटिलेटर बंगळुरु येथून रवाना झाले आहेत. यापूर्वी जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात 32 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. मात्र, आता बंगळुरुहून उपलब्ध होणारे हे व्हेंटिलेटर आवश्यक मागणीप्रमाणे तालुक्यांच्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी नुकतीच भेट देऊन परभणी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची पाहणी केली होती. त्यावेळी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आणखी सुसज्ज करण्यासाठी त्यांनी आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसारच हे व्हेंटिलेटर उपलब्ध झाले आहेत. दरम्यान, या ठिकाणच्या शासकीय रुग्णालयासह 20 खासगी रुग्णालये करोनावर उपचार करण्यासाठी कार्यान्वित होत आहेत. त्यासाठी एका बैठकीत जिल्हाधिकार्यांना काही खासगी डॉक्टरांनी तसे प्रस्ताव दिले दिले आहेत. त्यावर आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्यानंतर या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आयटीआय येथील कोविड सेंटर येथे 250 तर जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीत 750 बेड ऑक्सिजनच्या सुविधेसह सज्ज करण्याचे काम सुरू झाले आहे.
दरम्यान, शहरातील खासगी रुग्णालयेदेखील करोना उपचारासाठी पुढे आली आहेत. शहरातल्या 20 खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून करोनाबाधितांवर उपचार केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे. दरम्यान, बुधवारी केंद्रेकर यांनी आयटीआयस्थित कोविड सेंटरला भेट दिल्यानंतर कस्तुरबा गांधी विद्यालयालाही भेट दिली. यावेळी त्यांनी सर्व आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली आणि रुग्णांशी संवाद साधला. जेवण व अन्य सुविधाबद्दल काही तक्रारी आहेत का, हे जाणून घेतले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी प्रशासकीय अधिकार्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकार्यांसह सर्व महत्त्वाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
खासगी रुग्णालयांच्या डॉक्टरांची बैठक झाली. त्या बैठकीत कोविड रुग्णालयासाठी अनेकजण पुढे आले आहेत. तब्बल वीस खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून ऑक्सिजनची सुविधा असणाऱ्या 230 खाटा उपलब्ध होत आहेत. यात शहरातील सूर्या, स्वाती, नावंदर हॉस्पिटल आदींचा समावेश आहे. डॉ. प्रफुल्ल पाटील मल्टी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल यांनी 300 खाटांची तयारी दर्शविली असून, त्यांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याचेही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.