जळगाव - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे तीन महिन्यांपासून सर्व मार्केटमधील दुकाने बंद आहेत. लॉकडाऊनमध्ये आता शिथिलता दिल्याने दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शहरातील विविध मार्केटमधील व्यापाऱ्यांनी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे केली. यावेळी जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने मार्केटमधील दुकाने उघडणे शक्य नसल्याने वैयक्तिक हितापेक्षा सामाजिक हित व्यापाऱ्यांनी लक्षात घ्यावे, असे आवाहन आयुक्तांनी केले. तसेच मार्केटमधील दुकाने उघडता येणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.
लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यामध्ये शासनाने काही प्रमाणात शिथिलता दिली असून, सम-विषम प्रमाणात दुकाने सुरु करण्यासही परवानगी दिली आहे. मनपा प्रशासनाने मार्केटमधील दुकानांना देखील परवानगी द्यावी, या मागणीसाठी मंगळवारी विविध मार्केटमधील व्यापारी बांधवांनी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांची भेट घेतली.
शासनाच्या आदेशाप्रमाणे मार्केटमधील व्यावसायिकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात यावी. सर्व व्यापारी सामाजिक अंतर, मास्क वापरणे, सॅनीटायझरचा वापर करतील. या अटीवर दुकाने उघडण्यात यावी. जे व्यावसायिक नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच रेड झोनमध्ये दुकाने उघडण्यास परवानगी नसली तरी मानवतेच्या आधारावर दिवसभरात निदान 3 ते 4 तास दुकाने उघडण्याची परवानगी देण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली. मात्र, दुकाने सुरु करण्याबाबतचे सर्व अधिकार हे शासनाला आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन याबाबत कोणताही निर्णय घेवू शकत नाही.
जळगाव शहर सध्या रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे मार्केटमधील दुकाने उघडण्यास शासनाने काढलेल्या अध्यादेशात परवानगी देण्यात आली नसल्याचेही आयुक्तांनी सांगितले. दरम्यान, नियमांच्या आधारावरच दुकाने उघडू शकणार आहेत. त्यासाठी सर्वांनी मिळून शहर रेड झोनमधून बाहेर काढावे लागेल, असे महापौर भारती सोनवणे यांनी या बैठकीत सांगितले.
यावेळी महापौर दालनात झालेल्या या बैठकीत महापौर भारती सोनवणे, मनपा स्थायी समिती सभापती अॅड. शुचिता हाडा, नगरसेवक सचिन पाटील, नवनाथ दारकुंडे, बबलु समदडीया यांच्यासह अनेक व्यापारी देखील उपस्थित होते.