पुणे- भिमाशंकर, डिंबा, चासकमान, जुन्नर नाणेघाटाचा परिसर निसर्गाने फुलला आहे. मात्र या परिसरांमधील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व पर्यटनावरील कोरोनाचे सावट दूर करण्याचा हेतूने जिल्ह्याधिकाऱ्यांनी पर्यटन बंदीचे आदेश काढले असून पर्यंटनस्थळांवर स्थानिक पोलिसांकडून नाकेबंदी लावण्यात आली आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करत पर्यटनाच्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांवर कारवाईचे सत्र सुरू केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिली आहे.
भिमाशंकर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून डोंगर कपाऱ्यांमधून छोटे मोठे धबधबे कोसळत आहेत. तर काही भागात हिरव्यागार निसर्गात पांढरी शुभ्र धुक्याची चादर पसरत आहे. अशा मन प्रसन्न करणाऱ्या निसर्गाची अनेकांना भुरळ पडत आहे. मात्र पर्यटक वाढल्यास कोरोनाचे संसर्ग वाढू शकते त्यामुळे भर पावसात घोडेगाव पोलिसांनी भिमाशंकर परिसरात ठिकठिकाणी नाकेबंदी लावली असून कारवाईला सुरुवात केली आहे.
तसेच, बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असणारे भिमाशंकर मंदिर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दर्शनासाठी बंद आहे. त्यामुळे राज्य व परराज्यातील भाविकांनी या परिसरात येऊ नये, अन्यथा आपल्यावर भादवि कलम 188 प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी केले.