गडचिरोली- जिल्ह्यात आज एकाच दिवशी राज्य राखीव दलाच्या 72 जवानांसह अन्य एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आजपर्यंतचा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा हा सर्वांत मोठा आकडा आहे. आतापर्यंत आढळलेल्या एकूण 279 कोरोनाबाधितांमध्ये 205 रुग्ण हे पोलीस दलातील आहेत.
आज कोरोनाबाधित आढळलेले 72 जवान गडचिरोली येथे संस्थात्मक विलगीकरणात होते. तर पॉझिटिव्ह आढळलेला अन्य व्यक्ती हा मुंबईहून आलेला आहे. आजच देसाईगंज येथील एसआरपीच्या 4 जवानांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 279 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून 113 रुग्ण कोरोना आजारातून बरे झाले आहेत. सद्या जिल्ह्यात 165 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोरोनाबाधितांमध्ये पोलीस दलातील जवानांची संख्या अधिक
आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधित आढळलेल्या व्यक्तींमध्ये पोलीस दलातील जवानांची संख्या अधिक आहे. सीआरपीएफचे 88, एसआरपीचे 115 व बीआरओचे 2 असे 205 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. हे रुग्ण आता बरे होऊ लागले आहेत.