गडचिरोली- नक्षलवादी असल्याचे सांगत कुऱ्हाडीच्या धाकावर प्रवाशांना लुटणाऱ्या तिघांना कोरची पोलिसांनी आज अटक केलीे. वसनलाल धुलाराम मडावी (रा. कोटरा), दप्यारे झाडुराम हलामी व श्रीराम दामेसाय मडावी दोन्ही (रा. सोनपूर, ता.कोरची) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
तिघेही कोरची तालुक्यातील वेगवेगळ्या मार्गावर रात्री उभे राहून ट्रकचालक व इतर वाहनधारकांना अडवून नक्षली असल्याचे सांगून कुऱ्हाडीच्या धाकाने पैसे वसूल करत होते. या टोळीने बेळगाव घाटात बस व ट्रक अडवून नागरिकांकडून पैसे लुटलेे. नाडेकल फाट्यावरही काही प्रवाशांकडून त्यांनी जबरीने वसुली केली होती.
दोन-तीन दिवसांपूर्वी आरोपींनी बोटेकसा रस्त्यावर एक ट्रक अडवून चालकाकडून तसेच अन्य नागरिकांकडून पैसे लुटण्याचा प्रयत्न केला. त्यातील तिघांपैकी दोन जण फरार झाले. मात्र, ट्रकचालक व काही नागरिकांनी एका अनोळखी इसमास पकडून कोरची पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर अन्य दोघांनाही अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडून 500 रुपये रोख, एक मोटारसायकल व एक मोबाईल असा एकूण 25 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला.