जत : 'सांगली जिल्ह्यातील जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर अवैध धंदे जोमात सुरू आहेत. पोलिसांनी पुन्हा हप्तेबाजी सुरू करून या व्यासायिकांना पाठीशी घालण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुखांनी तातडीने लक्ष घालून हे धंदे बंद करावेत, अन्यथा जत पोलीस ठाण्याच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोर्चा काढू', असा निर्वाणीचा इशारा माजी आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. यावेळी त्यांनी निरीक्षक उत्तम जाधव यांच्या बदलीची ही मागणी केली. तसेच, तत्कालीन पोलीस निरीक्षक शेळके यांची बदली करून तालुक्याला लुटणारे अधिकारी येथे आणून बसवले आहेत, असेही जगताप यांनी म्हटले.
पोलिसांकडून अभय?
जगताप पुढे म्हणाले, की 'आमदार विक्रम सावंत यांनी अधिवेशनात तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली. पण उलट हे धंदे जोमात सुरू झाले. यामुळे आमदार सावंत यांनी पोलिसांसोबत साटेलोटे केले की काय? अशी शंका निर्माण झाली आहे. आज जत हद्दीत मटका, जुगार, सावकारी, दारूविक्री, शिंदी, गुटखा विक्री आदी बेकायदेशीर व्यवसाय राजरोस सुरु आहेत. एकीकडे पोलीस सामान्य जनता, नियमांनी काम करणारे व्यावसायिक यांना नाहक त्रास देत आहेत, तर दुसरीकडे अवैध धंदेवाले व गुंडांना पोसण्याचे काम सुरू आहे. यामुळे पोलिसांची प्रतिमा डागळलेली आहे'.
पोलीस निरीक्षक शेळकेंची बदली का?
तत्कालीन पोलीस निरीक्षक शेळके चांगलं काम करत होते. त्यांची बदली करून तालुक्याला लुटणारे अधिकारी येथे आणून बसवले आहेत. हा सगळा प्रकार त्वरित न थांबल्यास पोलीस ठाण्याच्या विरोधात मोर्चा काढणार आहे, असा इशारा जगताप यांनी दिला.